Mahesh Mhatre

जगातील सगळयाच देशांमध्ये राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, अपवाद फक्त भारताचा. आपला देश स्वतंत्र होईपर्यंत लक्षावधी लोकांनी प्राणत्याग – स्वार्थत्याग करून लढा दिला. मध्यमवर्ग या सगळ्या लढाईत पुढे होता. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत भारतीय समाजमनाला दिशा दाखवण्यासाठी लेखक, विचारवंत, संपादक, प्राध्यापक, डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी भरलेला मध्यमवर्ग पुढे असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र प्रत्येक पांढरपेशा माणूस स्वतंत्रपणे वागू लागला. देशापेक्षा स्वहितासाठी राबू लागला. देशाला काही देण्यापेक्षा स्वत:साठी सर्व मागू लागला. परिणामी देशाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. वाईट स्थितीत कर्ता-कमावता मुलगा घर सोडून जावा, तद्वत १९६० पासून आमच्या देशातील बुद्धिमंत – प्रज्ञावंत वर्ग युरोप-अमेरिकेत जाऊन त्यांच्या सेवेत रमला आणि एन.आर.आय. (अनिवासी भारतीय) झाला. आजही त्या परिस्थितीत बदल झालेला नाही. भारतातील प्रतिष्ठेपेक्षा तिकडे मिळणा-या डॉलर्सपुढे लाचार झालेला हा वर्ग अपमानाला सरावला आहे. म्हणून त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे, ‘देश तुम्हाला काय देतो, यापेक्षा तुम्ही देशाला काय देता हे महत्त्वाचे’ हे सुप्रसिद्ध वाक्य लक्षात राहत नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्या डोळयांसमोर असणारे लंडनच्या ट्रॅफलगार चौकातील ‘ब्रिटन एक्सपेक्टस् एव्हरीबडी टू डू हिज डयुटी’ (प्रत्येकाने आपले कर्तव्य – कर्म चोख बजावले पाहिजे, ही ब्रिटनची अपेक्षा आहे) हे वाक्यही दिसत नाही. स्वार्थामुळे आई – बापांची पर्वा नसते, मग त्यांच्याकडून भारतमातेने काय अपेक्षा करावी? चीनच्या एकूण आर्थिक प्रगतीत विदेशात राहणा-या चिनी उद्योजकांचे मोलाचे योगदान आहे. त्या तुलनेत आमचे अनिवासी भारतीय खूपच अनास्था दाखवतात, असे का?
Read More …

गणपती, म्हणजे गणांचा, लोकांचा नेता. हा लोकनायक ‘सकळविद्यांचा अधिपती’ आहे. ज्ञानी असला, पराक्रमी असला तरी विनम्र आहे. तो लोकांना तापदायक ठरणा-या असुरांचा नायनाट करतो, म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. त्याचे दर्शन, मार्गदर्शन सगळ्या लोकांना सुखदायी असायचे म्हणून तो सुखकर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो. मनासारख्या चंचल असणा-या उंदराला त्याने आपले वाहन केल्यामुळे तो ‘मूषकवाहन’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या अवाढव्य शरीरामुळे त्याला ‘तुंदिलतनू’ म्हणतात, पण तसे असूनही तो छान नर्तन करू शकतो, हे त्याचे वैशिष्टय. त्याला गोड आवडते. मोद म्हणजे आनंद, आनंददायी मोदक तर गणपतीची ओळख बनली आहे, त्यामुळे जेव्हा घरोघरी गणपती येतात तेव्हा मोदकाच्या प्रतीकातून आनंदही घराघरात पसरतो. गजमुख, गणेश हा बुद्धिमत्ता, विद्या आणि समंजसपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे, पण तो त्याचा फक्त लोकरक्षणासाठी वापर करतो, त्याच्याकडे बुद्धी आहे, पण ती त्याने व्यासांकडे ‘महाभारत’ लिहिण्यासाठी वापरली. असा हा अवघ्या मराठी मनांना मोहवणारा लेखक गणेश विलक्षण हुशार आहे, म्हणून रिद्धी-सिद्धी त्याच्या शेजारी उभ्या असतात. आजवर बौद्धिक क्षेत्रात देशाला मार्गदर्शन करणा-या मराठी लोकांनी गणपतीचा हा गुण ओळखला होता, पण आता मात्र कुणालाच विद्येची आराधना करण्यास, विज्ञानाची साधना करण्यास वेळ नाही. सर्वाना हवाय रिद्धी-सिद्धींच्या माध्यमातून मिळणारा सुखोपभोग.. तसे शक्य नाही. देवासमोर रांगा लावून यश आणि सुख मिळायला, देवकृपा म्हणजे रेशनिंगचे धान्य आहे का?

Read More …

प्रत्येक देशाची ‘मुद्रा’ हा त्या देशाचा ‘चेहरा’ असतो. भारतीय मुद्रेचं डॉलरच्या तुलनेतलं पतन ही वित्तीय क्षितीजावरची अतिशय गंभीर बाब असली तरी या समस्येचा मुद्राराक्षस नियंत्रणाखाली आणण्यासाठी वित्तक्षेत्रातील तज्ज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांच्या ओझ्यामुळेच या मुद्रापतनाला आणि शेअर बाजारातील हिंदोळ्यांना चालना मिळते आहे, असा लोककल्याणाविरोधी धक्कादायक प्रचार माध्यमांमधून सुरू आहे. रुपया जसा गोल असतो, तशीच भाकरीही गोलच. गरिबांच्या उपाशी पोटात भाकारीचा घास जावा यासाठी आपले केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गोल रुपयाचा तोल जातोय, तसा काही नफेबाज कथित विचारवंतांचा तोलही ढळू लागलाय. मुद्रासमस्येच्या परिस्थितीआडून आकडयांचा बादरायण संबंध लावत लोककल्याणाच्या कार्यक्रमांनाच दोषी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण खेळले जात आहे. पण इतिहास साक्षी आहे की इथल्या श्रमिक शक्तीनेच अर्थकारणाचा गाडा आपल्या खांद्यावर घेऊन वित्तकारणाला सकारात्मक दिशा दिली आहे. आता हा इतिहास पुन्हा घडवायची वेळ आली आहे!
Read More …